---Advertisement---
जळगाव बसस्थानक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून त्यांची सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम लुटणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अटक केली आहे.
२० एप्रिल २०२६ रोजी दुपारी जिल्हा बँक कॉलनीतील रहिवासी गजानन विठोबा सनेर (वय ६५) हे जळगाव बसस्थानकावर आले होते. यावेळी दोन अज्ञात इसमांनी त्यांना गाठले. एकाने त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवले, तर दुसऱ्या साथीदाराने हाताला स्पर्श करून खड्याचा रुद्राक्ष तयार केल्याचे भासवले. “तुमचा शनिवार काढून देतो,” असे खोटे सांगून त्यांनी सनेर यांची सोन्याची अंगठी आणि पैसे काढून घेतले व तिथून पळ काढला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवण्यात आली. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे छापा टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी
१) अल्ताफ हसन मदारी (वय ३२, रा. नगरदेवळा, ता. पाचोरा)
२) मोहसीन गफ्फार मदारी (वय ३१, रा. चाळीसगाव)
पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांचा तिसरा साथीदार स्वप्न मदारी याचा शोध सुरू आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागुल आणि त्यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.









