---Advertisement---
जळगाव : शहरातील नवीन जोशी कॉलनी परिसरात २५ वर्षीय तरुण उद्योजकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. मोहित किरण जोशी असे मृत तरुणाचे नाव असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मोहित जोशी हा आपल्या कुटुंबासह नवीन जोशी कॉलनी परिसरात राहत होता. त्याच्या वडीलाचा एमआयडीसी परिसरात व्यवसाय आहे. मोहितदेखील वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता. गुरुवारी दुपारी मोहितने आपला मोबाईल स्विच ऑफ केला आणि तो घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेला. बराच वेळ होऊनही तो खाली न आल्याने कुटुंबियांना संशय आला.
सायंकाळी मोहितची आई त्याला बोलावण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली असता खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. बराच वेळ हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी मोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
आपल्या पोटाच्या गोळ्याला अशा अवस्थेत पाहताच आईने आक्रोश केला आणि एकच हंबर्डा दिला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. नागरिकांनी मोहितला तातडीने खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोहितच्या पश्चात आई-वडील, काका आणि भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.









