---Advertisement---
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्ह्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र नुकतेच कल्पिता पाटील यांना प्राप्त झाले आहे.
तरुणाईपासून सामाजिक प्रश्नांपर्यंत ठाम भूमिका मांडणाऱ्या कल्पिता पाटील यांनी युवती काँग्रेसमधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी संघटन कौशल्य आणि नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या सरपंच म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
२०१३ साली कल्याणेहोळ गावच्या सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी गावविकास, महिला सक्षमीकरण, पाणी व आरोग्य विषयक प्रश्नांवर प्रभावी काम केले. त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली असून, २०१६ मध्ये दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेसाठी भारतातून निवड झालेल्या पाच प्रतिनिधींमध्ये त्यांचा समावेश होता.
तसेच जळगाव ग्रामीणमध्ये महिलांना नवी संधी मिळाल्याने कल्पिता पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.नियुक्तीमुळे जळगाव ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महिला संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कल्पिता पाटील यांच्या नियुक्तीचे विविध राजकीय व सामाजिक स्तरांतून अभिनंदन होत असून, महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









