---Advertisement---
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. कीर्तनकार म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीवर एका अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव यशवंत एकनाथ थोरात असे असून तो ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित मुलगी सध्या १७ वर्षांची असून ती आठवीत शिकत असतानापासून आरोपीची तिच्यावर वाईट नजर होती, असा आरोप आहे. आरोपी आणि पीडितेच्या कुटुंबामध्ये ओळखीचे संबंध होते. तसेच पीडितेचा भाऊही आरोपीच्या संस्थेत काम करत असल्याचे समोर आले आहे. याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने २०२१ पासून मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला धमकावल्याची माहितीही समोर आली आहे. “कोणाला सांगितले तर कुटुंबाला संपवून टाकीन,” अशी धमकी देत पीडितेला भीतीत ठेवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी आरोपीने मुलीला फोन करून घरी बोलावले होते. मुलीने नकार दिल्यानंतर तिला धमकावण्यात आले. त्यानंतर ती आरोपीच्या घरी गेल्यावर तिला एका खोलीत डांबून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार तिच्यावर अत्यंत अमानुष पद्धतीने छळ करण्यात आला. या घटनेनंतर पीडितेची प्रकृती गंभीर झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले.
१४ मार्च रोजी पीडितेच्या भावाने तिची प्रकृती बिघडलेली पाहून चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणात पारनेर येथील पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आरोपी यशवंत एकनाथ थोरात याला रविवारी पहाटे अटक केली. न्यायालयाने त्याला २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर ढवळपुरी गावात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.









