---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी गावचे सुपुत्र आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले जवान बापू उखा कोळी (वय ४४) यांचे कर्तव्य बजावत असतानाच त्यांना वीरमरण आलं. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे निवडणूक बंदोबस्तासाठी गेले असताना २७ मार्च रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहारी गावचे सुपुत्र बापू कोळी हे नाशिक येथील नोट प्रेस युनिटमध्ये कार्यरत होते. विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी त्यांची पश्चिम बंगालमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. नाशिकहून सुमारे ९० जवानांची तुकडी रेल्वेने जलपाईगुडीकडे रवाना झाली होती. प्रवासादरम्यान त्यांना अचानक चक्कर येऊन हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बापू कोळी यांनी देशसेवेची जिद्द बाळगून २ ऑगस्ट २००२ रोजी CISF मध्ये प्रवेश केला होता. अत्यंत साध्या परिस्थितीतून पुढे येत त्यांनी तब्बल २४ वर्षे देशाच्या विविध भागांत प्रामाणिक सेवा बजावली. सध्या ते हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच लोहारी गावासह परिसरात शोककळा पसरली.
३० मार्च रोजी त्यांच्या पार्थिवावर मूळगाव लोहारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण गावाने अश्रुपूर्ण वातावरणात आपल्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप दिला. मुलगा तन्मय कोळी याने अंत्यसंस्कार विधी पार पाडला. या वेळी अनेक मान्यवर, अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “वीर जवान अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
देशसेवेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या या जवानाच्या निधनाने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.









