---Advertisement---
रावेर वनविभागाच्या वनरक्षकावर झालेल्या निलंबनाची कारवाई टाळण्याकरिता 15 हजार रुपयांची लाज स्वीकारणाऱ्या रावेर तालुक्यातील अहिरवाडी वनक्षेत्रातील वनपाल राजेंद्र अमृत सरदार यांच्यासह त्यांचा खाजगी पंटर दीपक रघुनाथ तायडे याला जळगाव एलसीबी पथकाने मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास अटक केल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. सदर कारवाईमुळे वनविभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून कळत आहे.
या लाच प्रकरणात नेमकं काय घडलं ? पाहुयात….
सदर तक्रारदार हे रावेर वनविभागात वनरक्षक असून विभागातील जीन्सी येथे ते कार्यरत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन, यावल यांनी दिनांक ०५ व ०६ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या रोप वनातील निंदणी कामाची तपासणी केली होती. त्यावेळी रावेर तालुक्यातील अहिरवाडी वनक्षेत्रातील वनपाल राजेंद्र सरदार यांनी व्हाट्सअप कॉलच्या संभाषणाद्वारे दिनांक ०७ रोजी निंदणीच्या कामातील त्रुटींमुळे निलंबन होणार असल्याची बातचीत केली होती. दरम्यान निलंबन जर टाळायचं असेल तर रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांना 15 हजार रुपये द्यावे लागतील, असं सांगत लाचेची रक्कम खाजगी पंटर दीपक तायडे यांच्या फोनपेवर पाठवण्यास सांगितलं मात्र तक्रारदाराकडे फोन पे नसल्याने त्यांनी एसबीआय बँकेच्या योनो ॲपद्वारे १३ हजार २५० रु. दीपक तायडे यांना पाठवत त्या व्यवहाराचा पुरावा म्हणून स्क्रीन शॉट अहिरवाडी वनक्षेत्रातील वनपाल राजेंद्र सरदार यांना पाठवला होता. रक्कम मिळाल्याचा दुजोरा मिळाल्यानंतर ०८ सप्टेंबर २०२४ रोजी तक्रारदाराने आरोपी राजेंद्र सरदार यांच्या निवासस्थानी जात उर्वरित १ हजार ७५० रुपये त्यांना रोख दिले.
लाच घेतल्यानंतर झाले निलंबन….
गेल्या दोन वर्षांपूर्वी १२ सप्टेंबर २०२४ रोजी प्रादेशिक वनरक्षक धुळे यांनी तक्रारदार वनरक्षकाला जिन्सी रोप वनातील निंदनीचे काम न केल्याने निलंबित केले व त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी तक्रारदाराने आरोपीची भेट घेतली असता निलंबन टाळण्यासाठी वरिष्ठांची भेट घेतो. मात्र त्यासाठी पुन्हा पैसे द्यावे लागतील असं सांगितल्याने सदर तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजी याबाबतची तक्रार दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागणी तसेच प्रभाव पाडणे व भ्रष्टाचाराच्या मार्गाने लाच मिळवल्याने या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व या दोन्ही आरोपींना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एलसीबीच्या पथकाने अटक केलेली आहे.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, हवालदार किशोर महाजन, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी करत या दोघांना अटक केली आहे.









