---Advertisement---
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या मुलावर राजकीय वैमनस्यातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. २९ मे २०२६ रोजी रात्री सुमारे सव्वा आठ वाजता हा प्रकार घडला. या हल्ल्यात वैभव नागेशकुमार पाडवी जखमी झाले असून प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे.
अक्कलकुवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाण्याविहीर गावाच्या फाट्यावर काही जणांनी एकत्र येत वैभव पाडवी यांना अडवून मारहाण केली. हल्लेखोरांनी त्यांच्या महिंद्रा थार (क्रमांक जीजे १६ एफए ४१००) या वाहनाचे नुकसान करत काचा फोडल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणात सागर रजेसिंग पाडवी, मित जितेंद्र पाडवी, सुमित कांतीलाल पाडवी, रवींद्र टेडग्या नाईक, रहेश रमेश तडवी, अजय मनोज पाडवी यांच्यासह अन्य काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमविणे, मारहाण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
पोलीस नाईक सुनील तुकाराम पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये आणि पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
या घटनेनंतर वाण्याविहीर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.









