---Advertisement---
यावल तालुक्यातील भोरटेक येथे महावितरणच्या वाकलेल्या वीज पोलमुळे वीज प्रवाह उतरून ५ शेळ्या जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना २ एप्रिल रोजी सकाळी घडली. या दुर्घटनेत शेळीपालक अनिल अर्जुन कोळी यांचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, काही वेळाच्या फरकाने मोठा अनर्थ टळल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, १ एप्रिल रोजी रात्री पाडळसे-भोरटेक परिसरात वादळी पाऊस झाला. या वादळामुळे कोळी यांच्या घराशेजारील महावितरणचा वीज पोल वाकून गोठ्याच्या पत्र्यावर झुकला. ही बाब लक्षात न आल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी ही दुर्घटना घडली. २ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ७:४५ वाजता कोळी यांचा भाचा शेळ्यांचे दूध काढून गोठ्याबाहेर पडला. त्यानंतर सकाळी ८ वाजता वीज पुरवठा सुरू होताच गोठ्याच्या पत्र्यावर आलेल्या करंटमुळे आत असलेल्या ५ शेळ्या जागीच ठार झाल्या. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याने तत्परतेने वीज पुरवठा खंडित केल्याने पुढील नुकसान टळले.
विशेष म्हणजे, हा वीज पोल धोकादायक अवस्थेत असल्याची तक्रार वर्षभरापासून केली जात होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे.
घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही. नंतर संपर्क झाल्यावरही विलंबाने प्रतिसाद मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल जावळे यांनी पीडिताशी संपर्क साधून सांत्वन केले तसेच संबंधित अधिकाऱ्यांना धोकादायक पोल तात्काळ हटवण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मृत शेळ्यांची तपासणी करण्यात आली असून पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून तात्काळ २ लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.
सध्या या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.









