---Advertisement---
शासनाकडून वृक्ष संवर्धनासाठी सातत्याने जनजागृती केली जात असली तरी काही तस्कर स्वतःच्या फायद्यासाठी जंगलातील मौल्यवान वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करत असल्याचे प्रकार अद्यापही समोर येत आहेत. अशाच एका गंभीर प्रकरणात पिंपळनेर वनविभागाने धडाकेबाज कारवाई करत लाकूड तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणला असून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. ६ फेब्रुवारी रोजी साक्री तालुक्यातील धामणधर जंगल परिसरातील कंपार्टमेंट क्रमांक २१० मध्ये अवैध वृक्षतोड होत असल्याची गोपनीय माहिती पिंपळनेर वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी सदर वनक्षेत्राची पाहणी केली असता सागवान जातीचे तोडलेले लाकूड पालापाचोळ्यात लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.

यानंतर आजूबाजूच्या परिसरात तपास केला असता जंगलालगत असलेल्या एका झोपडीमध्ये मशीनच्या सहाय्याने सागवान लाकडाचे चिराण करून फर्निचर तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून चिराण, घडीव व गोल साग असे एकूण ४९९ नग, ५.२६३ घनमीटर लाकूड, एक आरे मशीन व इतर साहित्य असा अंदाजे २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
---Advertisement---
दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी परिस्थितीचा फायदा घेऊन फरार झाला असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या कारवाईचे नेतृत्व पिंपळनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले यांनी केले. सदर कारवाई वनसंरक्षक श्रीमती निनू सोमराज, उपवनसंरक्षक मो. बा. नाईकवाडी, विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर व सहायक वनसंरक्षक योगेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत साक्री व कोंडाईबारी वनपरिक्षेत्रातील अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर, राज्य राखीव पोलीस दल तसेच पिंपळनेर पोलिसांनी सहभाग घेतला. याप्रकरणी धामणदरचे वनरक्षक वरुणराज माळी यांनी वनगुन्हा दाखल केला असून पुढील तपास डांगशिरवाडेचे डी. एन. सोनवणे करीत आहेत. पिंपळनेर वनविभागाने केलेल्या या प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून अशा धडाकेबाज कारवाया सातत्याने व्हाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.









