२५ कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याने राज्यात मोठी खळबळ; २२ तलाठींसह ३१ जण जेरबंद…

---Advertisement---

 

जालना जिल्ह्यात अतिवृष्टी सरकारी अनुदानातील तब्बल २५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा भांडाफोड झाल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात मोठी कारवाई करत ३१ जणांना अटक केली असून यामध्ये तब्बल २२ तलाठी, ५ महसूल विभागातील कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी तसेच काही संगणक तज्ज्ञांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने बनावट लाभार्थी तयार करून अनुदानाची रक्कम स्वतःच्या किंवा संबंधित व्यक्तींच्या खात्यावर वळविल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, काही लाभार्थ्यांच्या नावावर एक गुंठाही जमीन नसतानाही त्यांना अनुदान मिळाल्याचे समोर आले आहे. या प्रकारातून सुमारे २४ कोटी ९० लाख रुपयांचा अपहार झाल्याचा अंदाज आहे.
तपासादरम्यान तहसीलदारांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून शासकीय प्रणालीमध्ये फेरफार करण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, न्यायालयाने सर्व आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. तसेच आरोपींची बँक खाती सील करण्यासोबतच मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणातील चार आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
हा घोटाळा उघडकीस आल्याने महसूल यंत्रणेच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---