---Advertisement---
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक मोठा बदल करण्याच्या तयारीत परिवहन विभाग असून, आता रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित (ओला-उबर) वाहन चालकांना ‘व्यवहारिक मराठी’ येणे अनिवार्य करण्यात आले आहे. २ मे २०२६ पासून या निर्णयाची कडक अंमलबजावणी होण्याची शक्यता असून, मराठी न येणाऱ्या चालकांचे परवाने (Permit) थेट रद्द करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे रिक्षा-टॅक्सी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
संघटनांचा एल्गार: उद्या गोरेगावात मोठी सभा
शासनाच्या या निर्णयाला ‘अन्यायकारक’ आणि ‘बेकायदेशीर’ ठरवत रिक्षा-टॅक्सी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याविरोधात पुढील रणनीती ठरवण्यासाठी उद्या, २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी मुंबईतील गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये एका भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार नेते शशांक राव यांनी सर्व चालकांना या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “मराठी न येणाऱ्यांचा रोजगार हिरावून घेणे हा अन्याय आहे,” अशी स्पष्ट भूमिका संघटनांनी घेतली आहे.
दुसरीकडे, परिवहन विभागाने आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. मराठी ही राज्याची अधिकृत राजभाषा असून, दररोज लाखो प्रवासी या वाहतुकीचा वापर करतात. अनेकदा अमराठी चालकांमुळे प्रवाशांशी संवाद साधण्यात अडचणी येतात, ज्यामुळे तक्रारींचे प्रमाण वाढते. प्रवाशांना चांगली सेवा मिळावी आणि भाषिक अडथळ्यांमुळे होणारे गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशानेच ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
ओला-उबर चालकही कक्षेत
हा नवीन नियम केवळ पारंपारिक काळी-पिवळी टॅक्सी किंवा रिक्षांपुरता मर्यादित नसून, तो ओला आणि उबर सारख्या कंपन्यांच्या चालकांनाही लागू होणार आहे. यामुळे मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमधील अमराठी चालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मंत्रालयात पुन्हा बैठक
या वादावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच शशांक राव, संजय निरुपम आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. आता उद्या, २७ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजता मंत्रालयातील ४०१ विस्तारित इमारतीत पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अमराठी चालकांना मराठी शिकवण्यासाठी शासन कोणते उपक्रम राबवणार, यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.









