---Advertisement---
जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या कुढापा चौक परिसरात रविवारी सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका राहत्या घरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन घरे पूर्णतः जळून खाक झाली. या आगीत पीडित कुटुंबांचा संसार अक्षरशः भस्मसात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुढापा चौक परिसरात निलेश शंकर शिरसाठ आणि बापू शंकर शिरसाठ यांची घरे आहेत. रविवारी सकाळी अचानक त्यांच्या घरात आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार प्रथम शॉर्टसर्किट झाले असून त्यानंतर गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की आगीच्या ज्वाळांनी आजूबाजूच्या घरांनाही वेढा घातला.

लाकडी पार्टिशनचे घर असल्यामुळे आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केले. या आगीत घरातील फर्निचर, कपडे, रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. डोळ्यादेखत संसार राखेत बदलल्याचे पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
---Advertisement---
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली; मात्र आग आटोक्याबाहेर गेली होती. घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिका अग्निशमन विभागाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. अरुंद रस्ते आणि आगीचे तीव्र स्वरूप यामुळे अग्निशमन जवानांना सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला. मात्र अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक पियुष कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देत आगीग्रस्त कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यांनी पीडितांना धीर देत प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पीडित कुटुंबांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.









