---Advertisement---
शहरातील महात्मा फुले मार्केट परिसरातील वाढत्या अतिक्रमणांवर महापौर दीपमाला काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उद्यापासून धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. महापौरांनी मंगळवारी दुपारी प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
फुले मार्केट व्यापारी असोसिएशनने मागील आठवड्यात समस्यांबाबत निवेदन दिल्यानंतर महापौरांनी हा पाहणी दौरा केला. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मतानी, मनपा उपायुक्त पंकज गोसावी, सहाय्यक उपायुक्त उदय पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याभोवती झालेल्या अतिक्रमणावर महापौरांनी संताप व्यक्त करत, “पुतळा परिसर पूर्णपणे मोकळा झाला पाहिजे,” असे सांगत तात्काळ कारवाईचे निर्देश दिले.
अधिकाऱ्यांच्या नियोजनावर नाराजी व्यक्त करत, गरज भासल्यास पोलिस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले.
अनधिकृत वायरिंग आणि शेड हटविणार
मार्केटमधील अनधिकृत वीजजोडण्या तोडण्यासह अवैध ताडपत्री व ग्रीन शेडनेट हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्यावर ठेवलेल्या जड पेट्याही हटविण्यात येणार आहेत.
विनापरवाना हॉकर्सना जागा देणाऱ्या दुकानदारांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा महापौरांनी दिला. नोंदणीकृत २००-३०० हॉकर्सच्या तुलनेत प्रत्यक्ष संख्या हजाराच्या घरात गेल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
बंद शौचालये सुरू करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक दुकानासमोर कचराकुंडी ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून सकाळी घंटागाडीमार्फत कचरा संकलन होणार आहे. तसेच पार्किंगसाठी जागा मोकळी ठेवण्याचे व पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, काही नागरिकांनी हॉकर्सना पैसे घेऊन जागा दिल्याचा आरोप केला असून, त्याबाबत पुरावे सादर करण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे. महापौरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, लवकरच फुले मार्केट अतिक्रमणमुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









