---Advertisement---
जळगाव जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यांत दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसासह गारपीट व वादळी वाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना जबर फटका बसला आहे. अनेक गावांमध्ये गहू, ज्वारी आणि मका ही पिके अक्षरशः आडवी पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांना धीर दिला.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला योग्य सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक माहितीनुसार जळगाव ग्रामीण मतदारसंघात सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हा आकडा जवळपास सहा हजार हेक्टरपर्यंत पोहोचल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले असून, शासनाकडून लवकरात लवकर मदत जाहीर होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.









