---Advertisement---
भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गेल्या तीन आठवड्यांपासून एका माकडाने अक्षरशः दहशत निर्माण केली असून आतापर्यंत तब्बल ३५ जणांना जखमी केले आहे. यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी होऊन भुसावळ येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. या प्रकाराबाबत वनविभागाकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
महिनाभरापूर्वी गाव परिसरात माकडांची एक टोळी दाखल झाली होती. त्यातील बहुतेक माकडे निघून गेली; मात्र एक माकड गेल्या तीन आठवड्यांपासून गावात थांबून नागरिकांवर अचानक हल्ले करत आहे. घरात घुसून महिलांवर व वृद्धांवर झडप घालणे, स्वयंपाकघरातील वस्तूंची नासधूस करणे असे प्रकार सुरू आहेत.
नीना काशिनाथ पाटील यांना घराच्या गच्चीवरून जोरात ढकलल्याने ते गंभीर जखमी झाले असून भुसावळ येथील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल आहेत. तसेच राजू पाटील यांनाही या माकडाने जखमी केले आहे. इतर अनेक ग्रामस्थांवरही हल्ले झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर माकड कोणत्याही वेळी, कोणावरही हल्ला करत असल्याने नागरिकांना दिवसा देखील घराबाहेर पडताना धास्ती वाटत आहे. शेतकामावर जाणे, लहान मुलांना शाळेत पाठवणे याबाबत पालक साशंक आहेत. गावात भीतीचे वातावरण पसरले असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
गावकऱ्यांनी वनविभागाला लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. मात्र संबंधित विभागाने केवळ पिंजरा लावून पुढील ठोस कार्यवाही न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “तीन आठवड्यांत ३५ जण जखमी झाले, तरीही माकडाला पकडण्यासाठी प्रभावी प्रयत्न होत नाहीत,” अशी नाराजी सरपंच लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केली. सदर माकडाला तात्काळ पकडून गावकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.









