जळगाव : शहरात दिवसेंदिवस अतिक्रमणाची समस्या जटिल होत आहे. यावर महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त धनश्री शिंदे यांच्या सूचनेनुसार शहरातील चौकांमधील अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या. यानुसार आज शुक्रवारी (२३ मे ) कोर्ट चौक ते महर्षी दधीचे चौक मुख्य रस्त्यावर अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविण्यात आली. या कारवाईत एकूण ३० कच्चे अतिक्रमण हटविण्यात आली आहेत.
ही कारवाई प्रभाग अधिकारी उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक संजय ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. दाणा बाजार, सुभाष चौक, शहरातील मध्यवर्ती भाग कोर्ट चौक नेहरू चौक , टॉवर चौक ते दधीचा चौकापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान अतिक्रमणधारकांकडून ५ लोडगाड्या, ५ काटे, २ छत्र्या, ६ स्टॅण्ड, ३ कॅरेज अशी विविध साहित्य जप्त करण्यात आले. यासोबतच भाजीपाला विक्रेत्यांकडून नाशवंत माल विक्रीसाठी करण्यात आलेल्या अतिक्रमणावरही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. एकूण १० विक्रेत्यांकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या मोहिमेदरम्यान सुभाष चौकातील रतनलाल सी. बाफना यांनी मनपाच्या जागेवर ३० x ६० आकाराचा व १.५ फूट उंचीचा ओटा उभारलेला असल्याचे आढळून आले. यावर त्यांना तातडीने अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे मोकादम संजय पाटील, नाना कोळी, साजीद अली, शेखर ठाकुर, सलमान मिस्त्री, भानू ठाकरे, नितीन भालेराव, दीपक कोळी यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी झाली. महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, रस्ते मोकळे झाल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.