नंदुरबार : जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील खुंटवाडा येथे एका व्यक्तीने शेतात गांजाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केलेली होती. शेतात पोलीस पथकाने जाऊन तपासणी केली असता तेथे गांजा सदृश्य झाडांची लागवड करुन जोपासना केल्याचे दिसून आले. या ठिकाणाहून १३ लाख ४५ हजार रुपयांचा एकूण १ क्विंटल ३० किलो ८५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शेत मालकास अटक करण्यात आली आहे. शेतात बेकायदेशीर गांजा लागवड केल्या प्रकरणी सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन माल ताब्यात घेण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्यात शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केल्याचे प्रकार उघड होत असतात. पोलीस पथकाद्वारे सातत्याने कारवाई होत असताना देखील या भागात गांजा कसा उगवला जातो? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. यातच धडगाव सारख्या दुर्गम तालुक्यात पुन्हा एकदा १३ लाखांचा गांजा आढळून आला आहे. शेतात लावलेल्या पिकांमध्ये गांजाची लागवड केली जात आहे. अशा प्रकारे धडगाव तालुक्यातील खुंटवडा येथे ज्वारीच्या शेतात गांजाची लागवड केलेली आढळून आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, धडगाव तालुक्यातील खुंटवडा येथे रोहिदास रुपसिंग पावरा (वय अंदाजे ६३ वर्ष रा. खुटवडा काराभारीपाडा ) याने ज्वारीची शेती केली आहे. पोलिसांनी या शेतात छापा मारण्यात आला. तपासणी अंती १३ लाख ४५ लाख ३०० रु. किं.चे १४४ गांजा सदृश्य झाडे (एकूण वजन १ क्विटल ३० किलो ८५० ग्रॅम ) आढळून आलेत. गांजा सदृश लागवड केलेल्या गांजाची बारीक शेतीमुळे मिश्रीत मातीच्या नमुन्यासह ते जप्त करण्यात आले आहे. गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या गांजाची लागवड करुन जोपासना करणे या आरोपाखाली 220/2024 गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) (ii) (ब) क प्रमाणे धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.