---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या रसायनयुक्त विषारी दारूच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या गंभीर प्रश्नावर पक्षाच्या शिष्टमंडळाने थेट मुंबई गाठून उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली व जिल्ह्यात सुरू असलेला हा अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्याची मागणी केली.
रावेर लोकसभा मतदारसंघातील भुसावळ, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर या तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यात ‘पन्नी-फुगा’ या नावाने विषारी दारूची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शहरांमधील पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि हातगाड्यांवर ही दारू उपलब्ध होत असून, यामध्ये ऑक्सिटोसीन सारख्या अत्यंत घातक रसायनांचा वापर केला जात आहे. या विषारी घटकांमुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेक युवकांचे आरोग्य आणि आयुष्य धोक्यात आले आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. विभागातर्फे या प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे अवैध विक्रेत्यांचे मनोबल वाढले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
शिष्टमंडळाने मंत्री महोदयांकडे खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
विशेष मोहीम: संपूर्ण जिल्ह्यात अवैध दारू विक्री विरोधात तातडीने विशेष मोहीम राबवून कडक कारवाई करावी.
अधिकाऱ्यांची चौकशी: उत्पादन शुल्क विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे सिंडिकेट फोफावले आहे, त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.
कायमस्वरूपी यंत्रणा: विषारी दारू विक्रीचे जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी जिल्ह्यात कायमस्वरूपी यंत्रणा कार्यान्वित करावी.
मंत्र्यांचे आश्वासक पाऊल
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या तक्रारीची दखल घेत, विषारी दारू विक्रीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर उपाययोजना करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या तक्रारीमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर दारूविक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









