---Advertisement---
मुंबई : राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांमध्ये अंतिम निवड न झालेल्या, मात्र वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या उमेदवारांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. युपीएससीच्या ‘प्रतिभा सेतू’ या उपक्रमाच्या धर्तीवर एमपीएससीचा ‘निपुण सेतू’ या अभिनव उपक्रमाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आता प्रतिक्षेतील उमेदवारांना विविध शासकीय विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे.
राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे मानले जात आहे. अनेक वर्षे प्रयत्न करूनही अंतिम यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांना या माध्यमातून नवी दिशा मिळणार आहे.
काय आहे ‘निपुण सेतू’ उपक्रम ?
‘निपुण सेतू’ हा राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, यात एमपीएससीमार्फत एका विभागासाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या वेटिंग लिस्टचा उपयोग इतर विभागांतील रिक्त पदांसाठी केला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना पुन्हा-पुन्हा वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जाण्याची गरज पडणार नाही.
या उपक्रमामुळे उमेदवारांना अनेक स्तरांवर फायदा होणार आहे. एका विभागासाठी दिलेल्या परीक्षेच्या गुणांच्या आधारे इतर विभागांत संधी उपलब्ध होणार आहे. वारंवार परीक्षा देण्याचा मानसिक ताण कमी होईल, तसेच वेळ आणि आर्थिक खर्चाची बचत होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पात्र उमेदवारांना लवकर नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कशी होणार अंमलबजावणी?
या उपक्रमांतर्गत एमपीएससीकडील वेटिंग लिस्टमधील माहिती विविध शासकीय विभागांशी शेअर केली जाणार आहे. त्यानुसार संबंधित विभाग त्यांच्या गरजेनुसार उमेदवारांची निवड करतील आणि आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणाऱ्यांना अंतिम नियुक्ती दिली जाईल.
विद्यार्थ्यांमध्ये समाधान
या निर्णयाचे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत आहे. अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी हा मोठा दिलासा ठरला असून, त्यांच्या करिअरसाठी ‘निपुण सेतू’ उपक्रम महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.









