कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी परिपत्रकावर आक्षेप ! मराठीचा अपमान खपवून घेणार नाही !” मनविसेचा थेट इशारा…

---Advertisement---

 

महाराष्ट्रातील मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रशासनाच्या भोंगळ आणि बेफिकीर कारभाराविरोधात मनविसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच प्रसिद्ध केलेले महत्त्वाचे अध्यादेश आणि परिपत्रके केवळ इंग्रजी भाषेत जारी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हे आदेश ७ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आले असून, त्यामध्ये मराठी भाषेचा पूर्णतः अभाव असल्याने ग्रामीण, आदिवासी व मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर मनविसेच्या शिष्टमंडळाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांची भेट घेत थेट जाब विचारला. “महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असताना आणि उत्तर महाराष्ट्रात बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातून येत असताना, विद्यापीठ इंग्रजीचा अट्टाहास का करत आहे?” असा खडा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

मनविसेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांनी प्रशासनावर जोरदार टीका करताना सांगितले की, इंग्रजीतील क्लिष्ट नियमांमुळे सामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नियमच समजत नसतील, तर विद्यार्थी आपले हक्क कसे मांडणार? हा थेट मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.

मनविसेने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तीन ठोस मागण्या मांडल्या आहेत ;

▪️ वादग्रस्त अध्यादेश व परिपत्रकांचे तातडीने मराठीत भाषांतर करून प्रसिद्ध करावे
▪️ भविष्यातील सर्व नोटीस, आदेश व पत्रव्यवहार केवळ मराठीतच असावा
▪️ विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सोप्या व स्पष्ट मराठी भाषेचा वापर करावा

जर विद्यापीठ प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडेल, असा स्पष्ट आणि इशारा वजा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---