---Advertisement---
पंढरपूर येथे बहूप्रतिक्षित कॉरिडॉर आणि सर्वांगीण विकास आराखड्याला अखेर मंजुरी मिळाली असून मंदिर परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ शिखर समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार , पालकमंत्री जयकुमार गोरे , वनमंत्री गणेश नाईक , आमदार समाधान आवताडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भूसंपादनासह इतर आवश्यक प्रक्रिया १ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विठ्ठल टेम्पल पंढरपूर येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः आषाढी आणि कार्तिकी एकादशीला भाविकांचा प्रचंड जनसागर उसळतो. गेल्या आषाढी एकादशीला सुमारे २७ ते २८ लाख भाविकांनी पंढरपूरला भेट दिल्याची नोंद आहे.
या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुमारे ४ हजार कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यात मंदिर परिसरात कॉरिडॉर उभारणी, सुरक्षितता वाढवणे, तसेच भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शनाची सुविधा देणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. पुढील ५० वर्षांतील भाविकांची वाढ लक्षात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकल्पामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये सुरुवातीला भीतीचे वातावरण होते. जुन्या दुकानांचे स्थलांतर होणार असल्याने काहींनी विरोधही केला होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांना विश्वासात घेतले. या कॉरिडॉरमुळे व्यापाराला चालना मिळून व्यवसाय दहापट वाढेल, असा दावा त्यांनी केला.
या निर्णयामुळे पंढरपूरच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









