---Advertisement---
नागपूर : विदर्भ, खान्देश आणि कोकणाला जोडणाऱ्या नागपूर-मडगाव विशेष एक्स्प्रेस रेल्वेला अखेर नियमित दर्जा देण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. ०११३९/४० या विशेष गाडीचे आता ११२०३/०४ नागपूर-मडगाव एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले असून ती नियमित स्वरूपात धावणार आहे. मात्र वैभववाडी रोड, विलवडे, पेण, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, मूर्तीजापूर आणि चांदूर या अतिरिक्त थांब्यांच्या मागणीकडे अद्यापही रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही.
विदर्भातून थेट कोकण रेल्वेमार्गावर जाणारी रेल्वेसेवा नसल्याने प्रवासी, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांकडून सातत्याने मागणी होत होती. नवरात्र, दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांदरम्यान सुरू करण्यात आलेल्या ०११३९/४० नागपूर-मडगाव विशेष एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर रेल्वे बोर्डाने तिला कायमस्वरूपी दर्जा देण्याचा निर्णय घेतला.
रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकानुसार, ११२०३ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी ३.०५ वाजता नागपूर जंक्शनवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.४६ वाजता मडगाव (गोवा) येथे पोहोचेल.
तर ११२०४ मडगाव-नागपूर एक्स्प्रेस गुरुवारी आणि रविवारी रात्री ७.०१ वाजता मडगाव येथून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी रात्री ९.४६ वाजता नागपूर जंक्शनला पोहोचणार आहे.
या एक्स्प्रेसला अप आणि डाऊन मार्गावरील वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थीवीम आणि करमाळी या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
या नियमित रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण १६ मे २०२६ पासून सुरू झाले असून प्रवासी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळासह IRCTC आणि NTES ॲपच्या माध्यमातून तिकीट आरक्षित करू शकतात.
या रेल्वेसेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण-सावंतवाडीचे संस्थापक अध्यक्ष सुनिल उत्तेकर, यशवंत परब, वैभव बहुतुळे आणि ओमकार माळगांवकर यांनी केले आहे.









