---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे. भुसावळ शहरासह परिसरात रात्री 10 नंतर डीजे आणि मोठ्या आवाजातील वाद्यांवर कडक बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील विविध भागांमध्ये विशेष पोलीस पथकांची नेमणूक करण्यात आली असून, डीजे बंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भुसावळ शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सराईत व वारंवार गुन्हे करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भुसावळ शहर पोलीस ठाणे व बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयित गुन्हेगारांवर हद्दपार तसेच MPDA (महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा) अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्राथमिक टप्प्यात सुमारे 15 गुन्हेगारांवर हद्दपार व MPDA कारवाईचे प्रस्ताव पाठविण्याची तयारी असून, त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सखोल आढावा घेतला जात आहे. संबंधित व्यक्तींच्या हालचालींवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची सविस्तर माहिती संकलित केली जात असून, गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार काहींवर हद्दपारीची तर काहींवर MPDA अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. येत्या आठवडाभरात हे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात येणार आहेत. तसेच कायदा हातात घेणाऱ्या, दहशत निर्माण करणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही असे स्पष्ट करत कायदा सर्वांसाठी समान आहे, असा ठाम इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी दिला आहे. मागील काही दिवसांपासून तिन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत उपद्रवी आणि दादागिरी करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.









