---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे शेतकी संघात ज्वारी खरेदीसाठी एमएसपी अंतर्गत ऑनलाईन नोंदणी टोकन वाटपावेळी मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. वाढती गर्दी आणि अपुऱ्या नियोजनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप होत असून, या गोंधळ दरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
भडगाव येथे घडलेल्या घटनेनुसार, शेतकी संघात ज्वारी नोंदणीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी पहाटेपासूनच शेतकी संघाच्या कार्यालयात रांगेत उभे होते. मात्र टोकन वाटपावेळी अचानक गर्दी वाढल्याने गोंधळ निर्माण झाला. या परिस्थितीत पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज केल्याचा आरोप शेकऱ्यांकडून करण्यात आला आहे. या घटनेत तीन ते चार शेतकरी जखमी झाले असून, त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींच्या डोक्याला आणि पाठीला मार लागल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत जखमी शेतकरी संजय शांताराम पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्ही काही चुकीचे करण्यासाठी आलेलो नव्हतो. आम्ही आमच्या पिकाच्या विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी आलो होतो. मात्र योग्य नियोजन न करता पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला.” या घटनेमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, जखमी शेतकरी संजय पाटील यांची मुलगी राधिका पाटील हिनेही घडलेल्या घटनेबाबत संताप व्यक्त करत प्रशासनावर गंभीर आरोप केले. “माझे वडील रात्रीपासून उपाशीपोटी रांगेत उभे होते. त्यांना इतका मार लागला की भडगाव ते जळगावपर्यंत रक्त थांबत नव्हते. पोलिसांचे काम संरक्षणाचे आहे, मारहाणीचे नाही. आम्ही याविरोधात कायदेशीर लढाई लढणार,” असे ती म्हणाली.
या संपूर्ण घटनेमुळे भडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काळात या घटनेवर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









