धडगाव तालुक्यात बनावट दारु निर्मितीवर पोलिसांचा छापा; १.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त…!

---Advertisement---

 

धडगाव तालुक्यातील धनाजे गावातील कारभारीपाडा येथे सुरू असलेल्या बनावट दारु निर्मितीच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ५२ हजार ३०४ रुपये किमतीचे स्पिरीट आणि बनावट दारु तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना २३ मार्च  रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, धनाजे गावातील कारभारीपाडा येथे सुनील हात्या पाडवी नावाचा इसम कुडाच्या झोपडीत मानवी आरोग्यास घातक अशा स्पिरीटपासून बनावट देशी दारु तयार करत आहे. या माहितीची खातरजमा करून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने धाड टाकली.

 पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, एक इसम खाकी रंगाचे बॉक्स आणि पांढऱ्या गोण्या घेऊन बसलेला दिसला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने तेथून पळ काढला. झोपडीची झडती घेतली असता, तिथे ‘टँगो पंच’ ही बनावट देशी दारु तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट, रसायने आणि इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी एकूण १,५२,३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
       
या प्रकरणी आरोपी सुनील पाडवी याच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२३/२०२६ नुसार महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     
ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, अंमलदार सजन वाघ (पोहेकॉ), यशोदिप ओगले (पोकों) आणि धडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी या पथकाने ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---