---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वरणगावमध्ये राजकीय वर्तुळाला हादरवणारी मोठी घडामोड घडली आहे. एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या समर्थकांनीच त्यांना धक्का दिला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी थेट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला असून, विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र चौधरी यांनीही आपल्या समर्थकांसह खडसेंना रामराम ठोकला आहे.
राजेंद्र चौधरी हे वरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. मात्र निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे हे वरणगावात आलेच नसल्याची खंत त्यांनी उघडपणे व्यक्त केली आहे. याच नाराजीतून आपण पराभूत झाल्याचा आरोप त्यांनी एकनाथ खडसेंवर केला आहे.
खडसेंच्या कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे वरणगावातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून, एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.









