---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील आगामी राजकीय हालचाली आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) लागू करण्यात आले आहे. हा आदेश ३० जानेवारी २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहणार असल्याचं अप्पर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी जारी केले आहेत.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित असल्याने ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षांतर, सभा-मिरवणुका व संभाव्य तणाव लक्षात घेता सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशानुसार संबंधित कालावधीत शस्त्र, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगण्यास, दगडफेक, प्रतिकात्मक दहन, शांतता भंग करणारी भाषणे किंवा हावभाव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच पोलिस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
मात्र हा आदेश शासकीय कार्यक्रम, अंत्ययात्रा, लग्न समारंभ, धार्मिक मिरवणुका तसेच कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही. सदर प्रतिबंधात्मक आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी जारी केले आहेत.









