---Advertisement---
पुण्यावरून रावेरकडे येणाऱ्या एसटी बसचा फुलंब्रीजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. ही घटना आज पहाटे सुमारे २:४५ वाजण्याच्या सुमारास घडली असून, या अपघातात ३ प्रवासी जखमी झाले आहेत, तर २२ प्रवासी थोडक्यात बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर आगाराची पुणे–रावेर बस (क्र. MH-09-FL-0468) पुण्यावरून रावेरकडे येत होती. फुलंब्री परिसरातील हॉटेल साईप्रसादजवळ बस पोहोचली असता, बाजूने जाणाऱ्या एका स्कूल बसने अचानक उजवीकडे वळण घेतले.
या स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बसचालक सचिन बागूल यांनी बसचे नियंत्रण राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक वळण घेताना बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली.
या अपघातात योगेश रघुनाथ जोशी, यशोदाबाई विश्वनाथ कुमावत आणि मोहम्मद मोसिन हे तिघे प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
दरम्यान, बसमधील उर्वरित २२ प्रवासी सुरक्षित असून मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातात बसचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.









