---Advertisement---
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरात सरू असलेल्या वीजखांबावरील ॲल्यूमिनिअम तार चोरी प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, या गुन्ह्यामागील राजस्थान-गुजरात कनेक्शन नरडाणा पोलिसांनी उघड केले आहे. याप्रकरणी राजस्थानमधील सात संशयितांना अटक करण्यात आली असून, सुमारे १४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नरडाणा एमआयडीसी परिसर, तसेच शिंदखेडा तालुक्यातील विविध गावांत २० ते २४ फेब्रवारीदरम्यान वीजखांबांवरील ॲल्यूमिनिअम कंडक्टर (तार) चोरट्यांनी कापून नेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या सुमारे २५ लाखांच्या तारचोरीमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.
परिसरातील सीसीटीव्हीचे विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे नरडाणा पोलिसांनी संशयितांचा मार्ग काढला. तपासादरम्यान संशयित राजस्थान राज्यातील गट असल्याचे उघड झाले. चोरी केलेला ॲल्यूमिनिअम तार हा गुजरात राज्यातील एका भंगार व्यापाराला विकला जात असल्याचं उघड झाल. म्हणजेच चोरी ही महाराष्ट्रात होत होती व संशयित राजस्थानचे, तर विक्री गुजरातमध्ये होत होती. ही संपूर्ण साखळी उघड करीत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला.
या तार चोरी प्रकरणातील अटकेत असलेले संशयित आरोपी नारायणसिंग राजपूत (वय २८), गोकुलसिंग राजपूत (वय २२), हितेशसिंग ललसिंग, प्रकाशसिंग ललसिंग, भगवानसिंग ललसिंग (वय ३०), गोरेसिंग रामचंद्र तसेच चोरीचा माल खरेदी करणारा गुजरातमधील व्यापारी अशा सात संशयितांना अटक करण्यात आले असल्याचे समजले. संशयितांकडून तीन लाख ८५ हजारांचे बंडल व अॅल्युमिनिअम कंडक्टर, दहा लाखांचे आयशर कंपनीचे वाहन, तीस हजारांचे चार अँड्रॉइड मोबाइल, तसेच दहा हजारांची चोरीसाठी वापरलेली साधने, असा सुमारे १४ लाख ४५ हजारांचा मद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे, नरडाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी रवींद्र महाले, संजय पाटील, अरविंद पाटील, ललित पाटील, भरत चव्हाण, योगेश गिते, विक्रांत देसले, नारायण गवळी, चंद्रकांत सावंत, रईस शेख, रवींद्र मोराणीस, अनरसिंग पवार, गणेश पाटील, विजय माळी, दीपक भामरे, विनोद कोळी, अर्पण मोरे, प्रशांत पाटील, सचिन बागुल, सुनील गावित, सूरजकमार सावळे यांच्या पथकाने केली आहे.









