आचारसंहितेमुळे रेशन दुकानदारांचा संप स्थगित : अनिल अडकमोलांची माहिती


जळगाव : आपल्या कमिशन वाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ नोव्हेंबरपासून राज्यातील ५६ हजार सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार हे बेमुदत संपावर जाणार होते. परंतु, राज्यात विधान सभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. यामुळे रेशन दुकानदारांनी १ नोव्हेंबरपासून पुकारलेला बंद तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देवल यांनी नवीन सरकार आल्यावर तुमचे प्रश्न मांडा असे आवाहन आहे. याला संघटनेने सकारत्मक प्रतिसाद देत बंद स्थगित केला आहे. संघटनेच्या निर्णयाने गोरगरीब जनतेची दिवाळी सुखमय होण्यास मदत मिळणार आहे.


राज्यातील रेशन दुकानदारांनी केंद्र सरकारने क्विंटलमागे २० रुपये मार्जिन वाढवून द्यावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्या केल्या आहेत. रेशन दुकानदारांनी लक्ष्मीपूजनापासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. रेशन दुकानदारांनी पुकारलेल्या संपाची प्रधान सचिव देवल यांनी तातडीने दखल घेत चर्चेसाठी २४ ऑक्टोबर रोजी पाचारण केले.  यात रेशन दुकानदार महासंघ तसेच ऑल महाराष्ट्र रेशन दुकानदार फेडरेशन, अशा दोन्ही संघटनांसोबत बैठक घेऊन स्वस्त धान्य दुकानदार यांच्या कमिशनवाढीसह विविध प्रलंबित मागण्या शासनाच्या विचाराधीन आहेत. नवीन सरकार आल्यावर तुमचे प्रश्न मांडा असे आवाहन देखील प्रधान सचिवांनी केले.

प्रधान सचिव रणजित सिह देवल म्हणले की, आता राज्यात महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका होत असत्याने आदर्श आचासंहिता लागू आहे . येणाऱ्या नवीन मंत्रीमंडळात मीटिंग होऊन निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आपण पुकारलेला बंद मागे घेऊन दिवाळीसारख्या सणामध्ये आपापल्या लाभार्थीना वेळेवर अन्नधान्य पुरवठा करून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रधान सचिव यांनी दोन्ही संघटनांना केले. त्यामुळे शुक्रवार, १ नोव्हेंबर रोजी पुकारलेला संप मागे न घेता तुर्तास स्थगित करण्यात आला असल्याचे ऑल महाराष्ट्र रेशन फेडरेशनतर्फे सांगण्यात आल्याचे रेशन दुकानदार संघटनेचे अनिल अडकमोल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.