---Advertisement---
जळगाव : बनावट नोटा कब्जात बाळगणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांची टोळीच सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. जिल्ह्यातील एका संशयितासह छत्रपती संभाजीनगर येथील संशयित महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले. बनावट नोटा प्रकरणी सुरुवातीला अटकेतील दोघांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांची संख्या चारवर पोहोचली आहे. २४ हजार मूल्याच्या बनावट नोटा संशयितांनी शहरासह अन्यत्र चलनात आणलेल्या आहेत. या बनावट नोटांचे कनेक्शन संभाजीनगर असल्याचा तर्क लावला जात आहे.
बनावट नोटासंदर्भात सुगावा एलसीबीला गेल्या महिन्यात लागला. त्यानुसार पथकाने तपासाला गती दिली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या गेटजवळ दोन संशयित वावरताना दिसताच एलसीबीच्या टीमने दोघांची चौकशी केली असता त्यांच्याकडे सहा हजार रूपयांच्या ५०० रूपये किमतीच्या बारा बनावट नोटा आढळून आल्या होत्या. पथकाने त्यांना ताब्यात घेत जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले होते. ही कारवाई २७ जून रोजी केली. सचिन राजूपत तसेच सचिन गोसावी अशी संशयितांची नावे आहेत.
---Advertisement---
त्या नोटांचा घेणार शोध
पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता बनावट नोटा चलनात आणण्याचे काम होते. ते करुन जवळपास २४ हजार रुपये मूल्याच्या बनावट नोटा चलनात आम्ही आणल्या, अशी कबुली संशयितांनी दिली. या बनावट नोटा कोणत्या परिसरात तसेच केव्हा, कशा पध्दतीने चलनात आणल्या, याची माहिती संशयितांकडून घेण्यात येईल. त्या त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेऊन प्राप्त केलेले फुटेज तपासले जाईल. तपासचक्र बनावट नोटापर्यंत नेण्याचा प्रयत्न लवकर गती घेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दोन साथीदार गजाआड
जिल्हापेठ पोलिसांनी तपासातून विजय प्रभुलाल माहोरे याला अटक केली. त्याने चौकशीत या बनावट नोटा छत्रपती संभाजीनगरातील महिलेकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने कोकिळा मंगरुळे या महिलेस ताब्यात घेतले. जिल्ह्यात किंवा आणखी कोठे बनावट नोटा चलनात आणल्या किंवा कसे ? या अनुषंगाने बाबी तपासल्या जातील. बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांची टोळी सक्रिय असण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्याअनुषंगानेही तपास केला जाईल, असे सांगण्यात आले. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.