नंदुरबारमध्ये वाळू तस्करांचा थेट तहसीलदारांवर हल्ल्याचा प्रयत्न; उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

---Advertisement---

 

राज्यासह नंदुरबार जिल्ह्यात अवैध वाळू तस्करांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली असून थेट तहसीलदारांवरच धावून जाऊन धक्काबुक्की करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नंदुरबार येथील तहसीलदार प्रदीपकुमार रावसाहेब पवार (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून ५० मिनिटांनी तहसीलदार पवार हे भरारी पथकासह अवैध वाळू वाहतुकीची तपासणी करीत होते. यावेळी नंदुरबार शहरातील सी.बी. पेट्रोल पंप जवळील सार्वजनिक रस्त्यावर एक संशयित ट्रक अडवण्यात आला. ट्रक चालक गौरव सुरेश महिरे (वय २२) आणि क्लिनर पंकज राहुल बाविस्कर (वय २६, रा. पहेलवान नगर, नंदुरबार) यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली असता, दोघांनी अचानक तहसीलदार प्रदीप पवार यांच्या अंगावर धाव घेत धक्काबुक्की केली. यावेळी भरारी पथकातील इतर कर्मचाऱ्यांनाही त्यांनी ढकलल्याची माहिती आहे.

यापूर्वीही नंदुरबार जिल्ह्यात वाळू तस्करांकडून मंडळ अधिकारी, तलाठी आणि भरारी पथकातील अधिकाऱ्यांवर हल्ले, धमक्या व मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी भरारी पथकातील एका अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. अशा घटनांनंतर आता थेट तहसीलदारांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

या प्रकरणी दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संबंधित दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असून अवैध वाळू तस्करीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---