---Advertisement---
नवी दिल्ली : संस्कृत ही भाषा भारताचा आत्मा आहे. ही केवळ एक भाषा नसून, भारताची संस्कृती, परंपरा आणि जागतिक दृष्टिकोनाची मुख्य आधारस्तंभ आहे. भारताला समजून घेण्यासाठी संस्कृत समजून घेणे अत्यावश्यक आहे. कारण, यामध्ये आपला बौद्धिक वारसा, तत्त्वज्ञान आणि जीवनमूल्ये सामावलेली आहेत. संस्कृत ही केवळ एक भाषा नाही, तर ती एक भारताची प्राणशक्ती आहे. ती आपल्या विचार, संस्कृती आणि ज्ञानाचे सार दर्शवते आणि हे सार संपूर्ण जगापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी ‘भागवत यांनी सोमवारी केले.
संस्कृत भारतीचे नवननिर्मित मध्यवर्ती कार्यालय ‘प्रणव’च्या लोकार्पण सोहळ्याला डॉ. मोहनजी भागवत संबोधित करीत होते. अक्षय्य तृतीयेसारख्या शुभ मुहूर्तावर ‘प्रणव कार्यालयाचे लोकार्पण अत्यंत आनंददायी आणि शुभ संकेत आहेत. ‘प्रणव’ हे सृष्टीच्या आदिनादाचे प्रतीक आहे आणि याच नावाने आरंभलेला हा उपक्रम परिपूर्णतच्या दिशेने वाटचाल करेल, विश्वास त्यांनी व्यक्त केला. असा संस्कृत ही सर्व भारतीय भाषांमधील दुवा म्हणून कार्य करते आणि तिच्या माध्यमातून इतर भाषाही सहजतेने शिकता येतात.
संस्कृतमध्ये सामावलेल्या ज्ञान आणि विज्ञानाचा विशाल साठा संपूर्ण मानवजातीसाठी हितकारक आहे. कोणत्याही उपक्रमासाठी केवळ स्वारस्य असून भागत नाही, तर त्याऐवजी त्या उपक्रमाच्या उद्दिष्टाची स्पष्ट समज असणे तसेच संयम आणि चिकाटी बाळगणे आवश्यक असते. ज्याप्रमाणे श्वासोच्छ्वास करण्याची प्रक्रिया कधीही कंटाळवाणी न होता अविरतपणे सुरू असते, त्याचप्रमाणे संस्कृतशी संबंधित कार्यही कधीही न थकता सातत्याने पुढे नेले पाहिजे, असे डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले.
संस्कृतचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर करून आणि संभाषणाच्या माध्यमातून या भाषेवर सहजपणे प्रभुत्व मिळवता येते. या दृष्टीने संस्कृत संभाषण शिबिरे अत्यंत लाभदायी ठरतात. कारण, त्यांच्यामुळे अगदी अल्पावधीतच या भाषेमध्ये नैपुण्य प्राप्त करणे शक्य होते. जर आपल्याला संस्कृतला गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्यायचे असेल, तर आपण तिला जनसामान्यांची भाषा बनवले पाहिजे. भारताला समजून घेण्यासाठी संस्कृत ही भाषा अपरिहार्य आहे, असे डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले.
सर्व भाषांना सोबत घेऊन जाणे हेच संस्कृत भारतीचे उद्दिष्ट आहे. संस्कृतच्या माध्यमातून इतर भारतीय भाषा अधिक समृद्ध होतील आणि समाजात सांस्कृतिक एकात्मतेची भावना विकसित होईल, असे डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले.
संस्कृत भारतीचा विस्तार आणि ‘प्रणव’ची वैशिष्ट्ये
संस्कृतला बोलीभाषा बनवण्याच्या उद्देशाने १९८१ मध्ये संस्कृत भारतीची स्थापना झाली. कालांतराने या संस्थेचे रूपांतर एका व्यापक चळवळीत झाले आणि १९९५ मध्ये तिला औपचारिकपणे संस्कृत भारती नाव देण्यात आले, असे अखिल भारतीय संघटन मंत्री जयप्रकाश गौतम यांनी प्रास्ताविकात सांगितले. १९८१ मध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटाने सुरू केलेली ही चळवळ आज २८ देशांमध्ये आणि भारतातील ६६० जिल्ह्यांमध्ये विस्तारली आहे. विशाल संकुल असलेली ही इमारत ५० हजार वर्गफूट भागात पसरली आहे. हे कार्यालय आधुनिक सुविधा आणि प्राचीन परंपरेचा संगम म्हणून कार्य करते, असे ते म्हणाले.









