---Advertisement---
नागपूर : मानकापूर परिसरातील ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’चा संस्थापक रियाज काजी याने संस्थेतील चार महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करीत धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकला. एका विशिष्ट संघटनेशी जुळलेल्या रियाज काजीला विदेशातून मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
चार पीडित तरुणींच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी काजीला अटक केली आहे. त्याला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. काजीच्या विरोधातील प्रकरणाने आता मोठे वळण घेतले असून विनयभंग व मानसिक छळाच्या आरोपांबरोबरच त्याच्या आर्थिक नेटवर्कही समोर आले आहे. पीडितांनी काजीवर अश्लील वर्तन, मानसिक छळ, धमक्या देणे, बदनामी करणे तसेच धार्मिक बाबींवर दबाव टाकण्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या विरोधात आणखी काही पीडित समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार काजीच्या संस्थेला अमेरिका आणि बेंगळुरू येथील संस्थांकडून ‘ग्लोबल फंड’ मिळत होता. या निधीच्या आधारे त्याने २०१८ मध्ये ‘पढे हम, पढाएं हम’ हे अभियान सुरू केले होते. या मोहिमेतून झोपडपट्टीतील व शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच ओठ विकार असलेल्या सुमारे १७५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांचा खर्च संस्थेमार्फत उचलण्यात आल्याचा दावा त्याने प्रसारमाध्यमांवर केला होता.
काजीने २०१० मध्ये ही संस्था स्थापन केली होती. यापूर्वी तो आरोग्य विभागात कार्यरत होता. एचआयव्ही संदर्भातील कामकाज पाहत होता. २०१६ मध्ये नोकरी गेल्यानंतर त्याने सामाजिक क्षेत्रात काम सुरू ठेवले. त्याला विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले होते. तेव्हापासून तो धार्मिक संघटनांमधे काम करण्यास सक्रीय झाला. धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तो मोठमोठे कार्यक्रम आयोजित करीत होता, हे विशेष.
एसआयटी स्थापन करण्याची मागणी
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विश्व हिंदू परिषदेकडून पोलिसांना निवेदन देत विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. काजीच्या संपर्कातील इतर व्यक्ती, निधीचे स्रोत व वापर याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रकरणामुळे नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.









