जळगाव : ईच्छादेवी चौकात पोलीस चौकीपुढे महामार्गाला लागून रिफिलिंग सेंटरमध्ये वाहनात गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट होऊन गंभीर जखमी भरत सोमनाथ दालवाले (वय ५५, रा. भवानीपेठ ह.मु. यमुनानगर) यांचा शनिवार, ९ रोजी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत मृतांची संख्या दोन झाली असून आठ जखमींवर उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान प्रशासनातील कोणीही अधिकारी फिरकले नाहीत, शुक्रवारी मदतीची अंत्यत गरज होती. मात्र ती मिळाली नाही, असा गंभीर आरोप दालवाले कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी केला.
न्याय मिळत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मंगळवारी संध्याकाळी ईच्छादेवी परिसरातील गॅस सेंटरमधून एका वाहनात गॅस भरला जात होता. अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याने दहा जण जखमी झाले होते. तसेच तीन दुकाने या आगीच्या विळख्यात सापडले. गॅस सेंटर चालक दानिश शेख हे या दुर्घटनेत ६० टक्केहुन अधिक भाजून गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
येथील भरत दालवाले यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमा, मुलगा सुरज (वय २३) लहान मुलगा देवेश (वय १९) असे एकाच कुटुंबातील चौघेजण या स्फोटमध्ये जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान भरत दालवाले यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविले होते. मात्र खर्च पेलता येणे शक्य न झाल्याने पुन्हा त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर बर्न वार्डात उपचार सुरु होते.
गेल्या पाच दिवसापासून ते मृत्यूशी झुंज देत होते. शनिवारी दुपारी त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता कळाल्यानंतर कुटुंबियांसह नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश आणि यंत्रणेविरोधात संताप व्यक्त केला. न्याय मिळाल्याशिवाय भरत दालवाले यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा नातेवाईकांनी दिला.
पुणे येथील नातेवाईक ससूनमध्ये
दालवाले यांचे पुणे येथील नातेवाईक दिवाळीनिमित्त भरत दालवाले यांच्याकडे आले होते. ईच्छादेवी चौकातील गॅस सेंटरमधून गाडीत गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. यात पुणे येथील संजय गणेश दालवाले, प्रतिभा संजय दालवाले तसेच रश्मी संजय दालवाले हेही गंभीर जखमी झाले. या जखमींना पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ओमनी चालक संदीप सोपान शेजवळ ( वय ४५, रा. वाघनगर), अली रहेमान शेख (वय ३२), आरिफ अहेमद (वय २५) या जखमीवरही उपचार सुरू आहेत