---Advertisement---
बऱ्हाणपूर येथील मसाल्याच्या व्यापाऱ्याचे रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यावर आठ लाख रुपये लुटल्याप्रकरणी रावेर येथील गुन्हे शोध पथकाने या प्रकरणाचा तपास लावत सात जणांना अटक करण्यात केली आहे. मात्र अजुनही एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून अडीच लाख रुपये रोख रक्कम साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे .
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बऱ्हाणपूर येथील मसाल्याचे व्यापारी दीपक सुरेश धर्मांनी यांच्या दुकानातील कामागार गौरव वाघ व तौफिक तेली हे नेहमीप्रमाणे त्यांच्या विकलेल्या मालाचे पैसे वसुलीसाठी सावदा फैजपूर रावेर येथे दि. ६ फेब्रुवारी रोजी आले होते. वसुली करून मसाल्याचे व्यापारी दीपक सुरेश धर्मांनी मोटर सायकलने रावेर कडून बऱ्हाणपूर कडे जात असताना खानापूर आरटीओ टोल नाक्याजवळ काही अज्ञात आठ ते नऊ जणांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्या जवळील आठ लाख रुपये वसुलीची बॅग हिसकावून पलायन केले होते.
याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी शोध पथकाला तपासाबाबत निर्देश दिले. यावरून या पथकाने विविध ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तसेच वसुली कर्मचारी यांचीही चाचपणी घेतली. मात्र त्यांना यात काही आढळून आले नाही. पोलीस निरीक्षक जयस्वाल यांना गुप्त माहिती मिळाल्यावर त्यांनी तपास चक्रे फिरवून शोध कार्य सुरु केल.
फारुख शेख रईस, अत्ताउल्लाह खान दाउद खान, शेख सईद शेख कादर, शेख समीर शेख कलीम, राहील खान दाउद खान, रहेमान खान अय्युब खान, अक्रम खान इस्माईल खान सर्व रा. बंडु चौक रावेर यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे .या गुन्हयातील मुख्य आरोपी शेख हसन शेख अफजल रा. रुस्तम चौक रावेर हा सुगावा लागताच फरार झाला आहे. सदर आरोपीवर रावेर पोलीस स्टेशनला बरेच गुन्हे दाखल असुन तो सराईत गुन्हेगार आहे. रावेर गुन्हे शोध पथक त्याचा कसुन शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपींकडून गुन्हयात वापरलेल्या ९५ हजार रुपये किमतीची दोन मोटार सायकली तसेच २ लाख ५५ हजार रुपये रोख असे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा एकुण मुद्देमाल आरोपींकडुन जप्त करण्यात आलेला आहे.
सदर कार्यवाही पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील पो.हे.कॉ सुनिल वंजारी, गुन्हे शोध पथकातील कल्पेश आमोदकर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकारोद्दीन शेख, अतुल गाडीलोहार, गजानन बोने यांनी केली आहे. तसेच सायबर पोलिस स्टेशनचे गौरव पाटील व मिलींद जाधव यांनी वेळोवेळी तांत्रिक माहीती दिलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास उपनिरीक्षक निरीक्षक तुषार पाटील हे करीत आहे.









