भुसावळ खून प्रकरणातील सात संशयित पोलिसांच्या ताब्यात; चार गावठी कट्टे व तीन जिवंत काडतूस जप्त

भुसावळ :  शहरातील जाम मोहल्ला भागात शुक्रवारी सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेतून चहाच्या दुकानात तेहरीन नासीर शेख (वय २७) याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी त्वरित कारवाई करून सात संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून चार गावठी पिस्तुलं, तीन जिवंत काडतूस, आणि एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तेहरीन नासीर शेख शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता जाम मोहल्ल्यातील आर.के. किताब घरासमोरील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात आला होता. त्याच वेळी दोन दुचाकींवर तोंडाला रूमाल बांधून आलेल्या चार संशयितांनी गावठी पिस्तुलातून पाच गोळ्या झाडून तेहरीनचा खून केला.

या प्रकरणी तनवीर मजीद पटेल, अनवर पटेल, रमीज पटेल, शेख साहील शेख रशिद, मजीद पटेल, अदनान उर्फ काल्या शेख युनुस (सर्व रा. भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते.

११ जानेवारीला एलसीबीच्या पथकाने बल्लारशाह (जि. चंद्रपूर) येथे कारवाई करत सलमान अब्दुल मजीद पटेल (वय ३२) उर्फ रमीज पटेल याच्यासह दोन जणांना अटक केली. तसेच मनमाड परिसरात कारवाई करत अदनान शेख युनुस (वय २९), शेख साहील शेख रशिद (वय २१), अब्दुल नबी हनीफ पटेल (वय ३१), आणि सनीस नाइन मोहम्मद आसीफ (वय १९) यांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून चार गावठी पिस्तुलं, तीन जिवंत काडतूस आणि एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली. संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या मोहिमेत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलिसांनी घटनेतील आरोपींची कसून चौकशी सुरू केली असून, या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा संशय आहे.