---Advertisement---
ॲल्युमिनियम उत्पादने डिझाइन, निर्मिती आणि इन्स्टॉलेशन क्षेत्रात कार्यरत असलेल्या एचआरएस अलुग्लेझ लिमिटेडने पायाभूत सुविधा क्षेत्रातील आपली उपस्थिती अधिक बळकट केली आहे. कंपनीला अलीकडेच एकूण 12.76 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची कंत्राटे मिळाली असून, त्यात गुजरातमधील साणंद येथील ‘मायक्रॉन’ सेमीकंडक्टर प्रकल्पाचा समावेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
या एकूण ऑर्डर्सपैकी 3.2 कोटी रुपयांचे काम मायक्रॉनच्या साणंद येथील प्रकल्पात फॅसाड आणि ग्लेझिंगसाठी देण्यात आले आहे. हे काम 30 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याशिवाय, गॅलेक्सी रिअल इस्टेट डेव्हलपर्सकडून 4.92 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले असून, त्याअंतर्गत ॲल्युमिनियम खिडक्या, पाईप फिन्स आणि ग्लास रेलिंग यांचा पुरवठा व बसवणी केली जाणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे.
गोयल अँड को. कन्स्ट्रक्शनकडून कंपनीला 2.95 कोटी रुपयांचे ॲल्युमिनियम व काचेच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे. तसेच, PSP प्रोजेक्ट्स लिमिटेडने मुंद्रा येथील अदानी स्किल्ड अकॅडमीमध्ये ॲल्युमिनियम खिडक्यांसाठी 1.31 कोटी रुपयांचे काम एचआरएस अलुगेलेझला दिले आहे.
या नव्या प्रकल्पांमुळे पुढील दोन वर्षांत कंपनीच्या महसुलात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण या सर्व कामांची अंमलबजावणी पुढील 24 महिन्यांत होणार आहे.
दरम्यान, कंपनी उत्पादन क्षमतेत वाढ करण्यावरही भर देत आहे. अहमदाबादजवळील राजोडा येथे सुमारे 16 कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवीन उत्पादन प्रकल्प उभारला जात आहे. या कामासाठी चावडा इन्फ्रा लिमिटेडसोबत करार झाला असून, पुढील 15 महिन्यांत हा कारखाना सुरू करण्याचे लक्ष्य आहे.
व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने कंपनीने ‘जिओट्रिक्स बिल्डिंग एन्स्टव्हलप प्रायव्हेट लिमिटेड’चा एक सुरू असलेला व्यवसाय विकत घेतला आहे. यामुळे डिझाइन इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरल प्रीकास्ट या क्षेत्रांतील कंपनीची क्षमता वाढणार आहे.
आर्थिक बाबतीतही कंपनीची कामगिरी स्थिर आहे. डिसेंबर 2025 मध्ये कंपनीने 50.92 कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता, ज्याला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीने 42.14 कोटी रुपयांचा महसूल आणि 5.15 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. यासोबतच 34.24 टक्के इतका परतावा (ROE) कंपनीच्या आर्थिक स्थितीची मजबुती दर्शवतो.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रुपेश शाह यांनी सांगितले की, प्रतिष्ठित ग्राहकांकडून मिळणारा विश्वास ही आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. गुणवत्तापूर्ण काम आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करणे हेच आमचे प्रमुख ध्येय राहील.









