---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा पारा सातत्याने वाढत असून या तीव्र उकाड्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनावरांना बसत आहे. कडक उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्याने पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने विशेष ‘हायअलर्ट’ जारी करत पशुपालकांना जनावरांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, दूध उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पशु तज्ज्ञांच्या मते, दुपारच्या कडक उन्हात जनावरांना बाहेर नेणे टाळावे. त्यांना दिवसातून किमान ३ ते ४ वेळा स्वच्छ आणि थंड पाणी द्यावे. तसेच गोठ्यांमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे. छपरावर गवत किंवा पाट टाकल्यास उष्णता कमी होण्यास मदत होते.
याशिवाय, सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा जनावरांना चारा द्यावा. सध्या हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्याने कोरडा चारा देताना त्यावर पाणी शिंपडल्यास तो पचायला सोपा होतो.
जनावरांमध्ये श्वासोच्छवासाचा वेग वाढणे, तोंड उघडे ठेवणे, जास्त लाळ गळणे, अशक्तपणा येणे किंवा चारा कमी खाणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ नये यासाठी पशुपालकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.









