---Advertisement---
शेंदुर्णी परिसरातील कुरेशी वाड्यात कत्तलीसाठी जनावरे आणून गोमांसाची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर १ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता पोलिसांनी अचानक धाड टाकली. या कारवाईत कत्तलीसाठी ठेवलेली दहा जनावरे ताब्यात घेण्यात आली, तसेच संबंधित आरोपींनाही अटक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंदुर्णी येथील कसाई वाड्यावर छापा टाकताना शेख जमीन, शेख लतीफ (वय ४८, रा. शेंदुर्णी), सलमान शेख शिकलकर (वय २०, रा. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि कुरेशी अल्ताफ उर्फ अल्ताफ शेख (वय २५, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर, जि. जळगाव) यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने या आरोपींना ४ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याशिवाय या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध पोलीस घेत आहेत. पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११६/२०२६ नोंदवण्यात आला असून संबंधित कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पहूर पोलीस ठाण्याचे एपीआय प्रमोद कठोरे तसेच शेंदुर्णी पोलीस दुरक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने संयुक्तरित्या ही धाड केली.
जप्त करण्यात आलेली जनावरे पहूर येथील गोशाळेत हलविण्यात आली आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या अवैध गोमांस विक्रीत सहभागी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शेंदुर्णीत कसाई वाड्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली ही पहिलीच कारवाई असून नागरिक आणि गोप्रेमींकडून पोलिसांचे कौतुक व्यक्त केले जात आहे. तसेच रस्त्यावर बेकायदेशीरपणे मांस विक्री करणाऱ्यांविरोधातही अशीच कडक मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.









