---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणे परिसरात मुलाला पळवण्याच्या संशयावरून एका अनोळखी तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ही घटना २४ फेब्रुवारी रोजी पहाटे उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते कानळदा रोडवरील आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंग परिसरात सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास एक अनोळखी तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. त्या वेळी एका तीन वर्षीय बालकाला तो उचलून नेत असल्याचा संशय काही नागरिकांना आला. ही माहिती पसरताच परिसरात नागरिकांचा जमाव जमा झाला. कोणताही उशीर न करता आणि पोलीसांना न कळवता जमावाने त्या तरुणाला पकडले आणि त्यास बेदम मारहाण सुरू केली.
दरम्यान, आव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी या घटनेची माहिती तत्काळ जळगाव तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तेव्हा लक्ष्मी जिनिंग परिसरात मोठी गर्दी जमलेली होती आणि संबंधित तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्याच्या नाका-तोंडातून रक्त येत होते तसेच डोक्यावर, हातापायांवर गंभीर जखमा झालेल्या होत्या.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेत जखमी तरुणाला शासकीय वाहनातून तात्काळ जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले; मात्र मारहाणीमुळे झालेल्या गंभीर दुखापतींमुळे आज पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा खु.), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण, सध्या रा. सुरत), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय उर्फ बादल शशिकांत सोनवणे (दोन्ही रा. बामणोद, ता. यावल) आणि अफताब आरिफ खाटीक (रा. जळगाव) या पाच जणांना जळगाव तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच इतर अनोळखी व्यक्तींविरुद्धही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा जमावाकडून कायदा हातात घेण्याच्या प्रकारांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोणतीही खात्री न करता केवळ संशयावरून एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे आणि त्यात त्याचा मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा सखोल तपास केला जात असून पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









