---Advertisement---
दरोड्याच्या तयारीने चोपड्याहून निघालेल्या रेकॉर्डवरील सहा गुन्हेगारांच्या मुसक्या चोपडा पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून घरफोडीसाठी लागणारे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान यातील तीन जणांवर पुणे परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
चोपडा शहर पो.स्टे. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडा शहर पोलिसांनी मामलदे शिवारात चोपडा ते चुंचाळे रोडवर शिताफीने मोटर कार क्र-एम.एच.१४ ए एस ७९०५ या अंधारात निर्जन स्थळी थांबलेल्या मोटर कारचा शोध घेवुन तिच्यातील ६ इसमांना ताब्यात घेतले.
या वाहनामध्ये लोखंडी टॉमी, मिरची पुड, दोर हे घरफोडी व जबरी चोरी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य मिळुन आले. काहीतरी गुन्हेगारी कृत्य करण्याच्या उद्देशाने सहा जण थांबले असल्याचा संशय बळावला. या संशयितांचे काही गुन्हेगारी रेकार्ड आहे का? याची तपासणी केली असता त्यापैकी तीन इसमांवर खुन, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, दंगल, आर्म अॅक्ट अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे येथील पिंपरी चिंचवड व निगडी या पोलीस ठाण्यामध्ये दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हे सहा संशयित दरोड्याची तयारी करुनच चोपडा येथे थांबल्याचे निष्पन्न झाल्यावरुन त्यांचे ताब्यातील मोटर कार, मोबाईल फोन, रोख रक्कम, लोखंडी टाँमी, मिरची पुड, दोर असा एकुण १०,८१,०००/-रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांचे विरुध्द चोपड़ा शहर पोलीस ठाण्यात कलम ३१० (४) ३१० (५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या गुन्हयाचा तपास सपोनि एकनाथ भिसे हे करीत असुन मिळुन आलेल्या इसमांपैकी ३ इसम हे अल्पवयीन असल्याने त्यांना बालन्यायमंडळ येथे पाठविण्यात आले आहे. उर्वरीत तिघांमध्ये तुषार उर्फ तुषत्या गौतम झेंडे (वय-२५ वर्ष रा. उर्वल सोसायटी निगडी पिंपरी चिचंवड जि.पुणे), विनोद राकेश पवार (वय-२५ वर्ष रा. दत्तनगर चिंचवड जि. पुणे), सुनिल गोरख जाधव (वय-३० वर्ष रा. दत्तनगर चिंचवड जि. पुणे) यांना अटक करुन चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना २९ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या टोळीचा दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्याचा प्लॉन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हाणून पाडला आहे. ही कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेव घोलप याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरिक्षक एकनाथ भिसे, सफौ दिपक विसावे, जितेंद्र सोनवणे, पोहेकों संतोष पारधी, पोहेकॉ ज्ञानेश्वर जवागे, पोहेकॉ लक्ष्मण शिंगाणे, पोहेकाँ हर्षल पाटील, महेंद्र साळुके, पोना संदिप भोई, पोकों विनोद पाटील, पोकॉ निलेश वाघ, पोकॉ प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, गजेंद्र ठाकुर यांनी केली आहे.