​शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा इशारा

---Advertisement---

 

​जळगाव व धरणगाव तालुका खरीप पूर्व नियोजन बैठक संपन्न; ट्रॅक्टर वाटप, अपघातग्रस्त कुटुंबांना सानुग्रह अनुदान व आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान


​जळगाव (प्रतिनिधी): “शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्याच्या हिताला बाधा आणणाऱ्या कोणत्याही घटकाची गय केली जाणार नाही. बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशके विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर तात्काळ आणि कडक कारवाई करा,” असे स्पष्ट निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
​जिल्हा परिषद जळगाव येथील श्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात जळगाव व धरणगाव तालुक्यांची संयुक्त खरीप हंगाम २०२६ पूर्व नियोजन आढावा बैठक सोमवारी (दि. २७ एप्रिल) पार पडली. यावेळी ते बोलत होते.


​खरीप हंगामासाठी सज्ज राहण्याचे आवाहन
​बैठकीत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, खरीप हंगामासाठी खतांची पुरेशी उपलब्धता असून शेतकऱ्यांनी खत पुरवठ्याबाबत निश्चिंत राहावे. बदलत्या हवामानाचा विचार करता शेतकऱ्यांनी खालील बाबींचे पालन करावे:
​धूळपेर टाळा: निसर्गचक्र बदलत असल्याने धूळपेर न करता, पुरेसा पाऊस झाल्यावरच बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.
​पक्के बिल घ्या: केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे व खते खरेदी करा आणि त्याचे पक्के बिल हंगाम संपेपर्यंत जपून ठेवा.
​पीक पद्धती: एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक व मिश्रपीक पद्धतीचा अवलंब करावा.
​पालकमंत्र्यांनी कृषी अधिकाऱ्यांना नियमित शेतशिवार भेटी देण्याच्या सूचना केल्या, तसेच तरुण व महिलांना शेतकरी गट स्थापन करून प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले.


​या नियोजन बैठकीचे औचित्य साधून विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला:
​अपघात विमा अनुदान: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत ३४ शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर झाले. पंकज सोनवणे, अनिता पाटील व विनायक कोळी यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश प्रदान करण्यात आले.
​आदर्श शेतकरी सन्मान: प्राथमिक प्रक्रिया उद्योग सुरू करणारे योगेश झांबरे, तसेच उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणारे गोकुळ लंके (पथराड) व सुरेश पाटील (वावडदा) यांचा विशेष गौरव करण्यात आला.
​ट्रॅक्टर व प्रमाणपत्र वाटप: यावेळी लाभार्थ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या आणि शेतकरी गटांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.



​या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभन मस्के, उपविभागीय कृषी अधिकारी हर्षदा देसले यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, प्रगतशील शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुरबान तडवी यांनी केले, तर सूत्रसंचालन अमित भामरे व सुरेखा सपकाळे यांनी केले. आभार प्रदर्शन नरेंद्र पाटील व दीपक नागपुरे यांनी केले.


​”कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आधार आहे. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात.”
गुलाबराव पाटील, पालकमंत्री

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---