---Advertisement---
महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा राजकीय उलथापालथ घडवणारे निकाल समोर आले असून बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. विशेषतः सुनेत्रा पवार यांनी बारामतीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत नवा इतिहास रचला आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी तब्बल २,१८,९३० मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला आहे. राज्याच्या निवडणूक इतिहासातील आतापर्यंतच्या मताधिक्याचे विक्रम मोडीत काढत त्यांनी एक नवा उच्चांक गाठला आहे. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो आणि या निकालाने येथे राजकारणात नवे समीकरण तयार झाल्याचे चित्र आहे. याआधी या मतदारसंघातून अजित पवार यांनी १ लाख ६५ हजार मताधिक्याचा विक्रम केला होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी हा विक्रम मोठ्या फरकाने मागे टाकत जनतेचा प्रचंड विश्वास संपादन केला आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतही महायुतीला यश मिळाले आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी तब्बल १,३८,९२९ मतांनी विजय मिळवला आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या राजकीय वारशाला पुढे नेत अक्षय कर्डिले यांनी मतदारांचा विश्वास जिंकला आहे.
या दोन्ही निकालांनंतर बारामती आणि राहुरी परिसरात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला.









