---Advertisement---
जळगाव: श्री महावीर सहकारी बँक लि. च्या रिक्त झालेल्या दोन संचालकपदांसाठी नुकतीच पोटनिवडणूक पार पडली. यामध्ये सर्वसाधारण मतदार गटातून स्वरूपकुमार भागचंद लुंकड तर महिला मतदार गटातून रंजना जितेंद्र देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बँकेचे उपाध्यक्ष नानासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे आणि श्वेता चोरडिया यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे ही दोन पदे रिक्त झाली होती. नवीपेठ येथील बँकेच्या मुख्यालयात २६ एप्रिल रोजी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगावचे सहाय्यक निबंधक डी. व्ही. पाटील यांनी काम पाहिले. दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एकच वैध अर्ज आल्याने ही निवड अविरोध घोषित करण्यात आली.
नवनियुक्त संचालकांचे बँकेचे अध्यक्ष दलीचंदजी हस्तीमल जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, जेडीसीसी बँकेचे एमडी जितेंद्र देशमुख यांच्यासह उपस्थित सर्व संचालकांनी व मान्यवरांनी अभिनंदन केले.
यावेळी नवनियुक्त संचालकांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष दलीचंदजी जैन म्हणाले की, “संचालकांनी बँकेच्या सर्व शाखांना नियमित भेटी देऊन कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधावा. ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी नवनवीन कल्पना सुचवून बँकेच्या प्रगतीत योगदान द्यावे.”
नवनियुक्त संचालकांनी आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल बँकेच्या ज्येष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. यावेळी बँकेचे संचालक सुभाष लोढा, अशोक खिवसरा, जितेंद्र कोठारी, गुणवंत टोंगळे, सीईओ मनोहर पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









