जळगाव : अमळनेर येथील ‘रऊफ बँड’ संचालक अस्लम अली सय्यद याच्याविरुद्ध तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन मंगळवारी (२७ मे) रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना देण्यात आले.
अमळनेर येथील रऊफ बँडचे संचालक अस्लम अली सय्यद याच्यावर अमळनेर तालुक्यातील धानोरी येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. याप्रकरणी चौफुली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रऊफ बँडच्या वाहनांचा गैरवापर करून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. यामुळे वाहतूक व परिवहन नियमांचा भंग झाला असून, कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या:
रऊफ बँडचे वाहन तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस तपासात समाविष्ट करावे., आरोपी अस्लम अली आणि त्याच्या सहकाऱ्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स (CDR) तपासून संपूर्ण माहिती उघड करावी., • या प्रकरणासंबंधी संपूर्ण पथकाची बारकाईने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
ही घटना समाजात भीती व अस्वस्थता पसरवणारी असून, यामुळे भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध होण्यासाठी प्रशासनाने त्वरित कठोर पावले उचलावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, प्रदेश युवा उपाध्यक्ष भैरवी वाघ-पलांडे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा भारती सोनवणे, प्रदेश चिटणीस रेखा वर्मा, माजी नगरसेविका सुरेखा तायडे, भाग्यश्री चौधरी, सरोज पाठक, मनोज भांडारकर, धीरज वर्मा यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.