---Advertisement---
विक्की जाधव
अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून अमळनेरचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्यावर रेतीची अवैध वाहतुकीसंदर्भातील गंभीर स्वरूपाचे आरोप होत होते. ते रेती माफियांना पाठीशी घालतात, पैसे घेऊन कारवाई टाळतात, किंवा सरळसरळ कानाडोळा करतात असे आरोप करण्यात येत होते . यासंदर्भात काही नागरिकांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रारीही केल्या होत्या. परंतु, या सर्व आरोपांना फेटाळत तहसीलदार सुराणा यांनी पुराव्या शिवाय बोलू नका अशी कानउघाडणी केली होती.
---Advertisement---
यानंतर तहसीलदार सुराणा यांनी रेतीची अवैध वाहतूक करणारा पहिली रिक्षा पकडत थेट तहसील कार्यालयात जमा करून कारवाईचा श्रीगणेशा केला. ही कारवाई नव्हे, तर आपल्यावर लावलेल्या आरोपांना तहसीलदार यांनी दिलेले प्रत्यक्ष उत्तर असल्याचे शहरात चर्चिले जात आहे. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेमधीलच काहीजण रेतीची अवैध वाहतूकदारांना माहिती पुरवत असल्याचा संशयही यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.
पत्रकारांवरही आरोपांची सरबत्ती
या प्रकरणात अजून एक वळण आलं ते स्थानिक पत्रकारांबाबत केलेल्या टीकेमुळे. शहरातील काही जाणकारांनी असा आरोप केला की, “पाकीट न मिळाल्यामुळेच काही पत्रकार तहसीलदारांवर लक्ष केंद्रित करत आहेत का?” गेल्या काही दिवसांपासून एकाच वेळी विविध लोकल स्तरावर आलेल्या बातम्यांमुळे, स्वतः पत्रकारितेच्या निष्ठावानतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
‘डाग पुसला’ की नवा अध्याय सुरू?
सुराणा यांच्या या कारवाईनंतर अनेकांनी म्हटले की, “तहसीलदारांवरचा आरोपांचा डाग अखेर त्यांनी स्वतःच्या कृतीने पुसला आहे.” तर गेल्या कित्येक दिवसांपासून होत असलेल्या आरोपांना हे ठोस प्रत्युत्तर ठरले आहे.