---Advertisement---
राज्यात सध्या उष्णतेची लाट कायम असून बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवले जात आहे. काही ठिकाणी तापमानात किंचित वाढ दिसून येत असली तरी एकूण हवामान कोरडे राहिले आहे.
राज्यात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे ४४.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे ३०.९ अंश सेल्सिअस इतके होते. त्यामुळे पर्यटकांसाठी महाबळेश्वर सध्या दिलासादायक ठरत आहे.
जळगावमध्ये दिवसभर उकाडा जाणवत असून कमाल तापमान ४०.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तापमानात किंचित घट झाली असली तरी उष्णतेचा त्रास कायम आहे.
कोकणात यलो अलर्ट
कोकण-गोवा परिसरात ६ ते १० मे दरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भात वादळी पावसाची शक्यता
विदर्भात काही भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.
प्रमुख शहरांतील तापमान (°C):
मुंबई (कुलाबा) ३४.८, सांताक्रूझ ३४.२, पुणे ३७.४, लोहगाव ३९.६, जळगाव ४०.९, कोल्हापूर ३७.०, महाबळेश्वर ३०.९, मालेगाव ४१.०, सांगली ३९.६, सातारा ३७.८, सोलापूर ४०.८, छत्रपती संभाजीनगर ३९.३, परभणी ४०.९, बीड ४०.८, अकोला ४३.२, अमरावती ४२.६, नागपूर ४३.२, यवतमाळ ४१.६.
दरम्यान, उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पाणी व द्रवपदार्थांचे सेवन वाढवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









