---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे महापुरुषांचे फोटो असलेले बॅनर अज्ञात समाजकंटकांकडून फाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वाघळीतल्या या घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेत पुन्हा नवीन बॅनर लावले आणि गावात शांततेचे आवाहन केले. मात्र, सलग दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्याच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला.
महापुरुषांच्या बॅनर फाडण्याच्या या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी चाळीसगाव-पाचोरा रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी काही काळ वाहतूक रोखून धरत आपल्या भावना व्यक्त केल्या. “जोपर्यंत दोषींना अटक करून कठोर कारवाई केली जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा ठाम पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सध्या वाघळीत तणावपूर्ण शांतता असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तर दुसरीकडे दोषींना शोधून काढण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.









