---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली असून, भरधाव वेगाने धावणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
सदर अपघाताची घटना गुरुवार, दि. २ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास दसेगाव फाट्याजवळ घडली. मृत तरुणीचे नाव चंचल नामदेव लांडगे (वय १९) असे असून ती डी फार्मसीचे शिक्षण घेत होती. तिच्यासोबत असलेली वैष्णवी वैभव चौधरी (वय १९) ही गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंचल आणि वैष्णवी या दोघी दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की चंचल हिचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. वैष्णवी हिच्यावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, या अपघातामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
नागरिकांनी प्रशासनाकडे अवैध वाळू वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.









